शैक्षणिक

केवळ दाढी वाढवून छ. शिवाजी महाराज बनता येत नाही.. – डॉ फाळके

कॅम्प एज्यू.सोसायटीच्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये छ. शिवाजी महाराज व्याख्यान

महाराजांचा एक जरी विचार आत्मसात केला तरी आयुष्य सोन्यासारखे चमकेल – डॉ.फाळके

पिंपरी (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. आजच्या तरुणांनी शिवरायांचे आचार आणि विचारांचे चिंतन करावे. आजच्या जगात जास्त गरज आहे ती महाराजांच्या विचारांनी चालण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात.
आजच्या तरुण पिढीने निव्वळ मावळा म्हणवून न घेता महाराजांचे विचार जर आचरणात आणले तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे चमकल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज फक्त पुजायची नाही तर जगायची गोष्ट आहेत. केवळ फक्त दाढी मिशा वाढवून आणि कपाळी चंद्रकोर लावून कोणी शिवाजी नाही होत. असे उदगार लेखक,इतिहासकार डॉ केदारनाथ फाळके यांनी काढले.
चिंचवड येथील कॅम्प एजुकेशन सोसायटी चे डॉ. अरविंद बी. तेलंग इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन दिवस व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ अजयकुमार राय यांनी स्वागत केले.
डॉ फाळके पुढे म्हणाले कि,एक राजा किंवा अधिकारी कसा असावा,? याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या अंगी असलेले गुण म्हणजे निष्कलंक चारित्र्य, सातत्यपूर्ण प्रयत्न, समयसूचकता, आपल्या सेवकांप्रती विश्वास, धीरोदात्त वृत्ती, अचूक नियोजन व व्यवस्थापन या गुणांचा अभ्यास, विश्लेषण, आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.

आजही जय भवानी जय शिवाजी म्हणताना छाती गर्वाने फुलून येते. आजवर किती आले आणि किती गेले पण इतिहासाच्या पानावर आणि जनतेच्या मनावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे श्री शिवछत्रपती. असा राजा पुन्हा होणे नाही. आपण महाराजांचा एक तरी गुण आत्मसात केला तरी हीच शिवजंती साजरी केल्याचे सार्थक होईल.

“राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस,
राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुवासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ”

दोन दिवसीय व्याख्यानमालेत डॉ. फाळके यांनी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्याची त्यांनी अगदी मुद्देसूद आणि संदर्भांसहित समाधानकारक उत्तरे दिली आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सगळयांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अधिक जाणून घेण्याची जिद्द निर्माण झाली. त्यांनी दिलेल्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडली. अशा वक्त्यांची आज समाजाला गरज आहे.

प्राचार्य डॉ अजय राय म्हणाले कि,
आज जरी कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा सारखे विषय अभ्यासात येत असले तरी ते तात्पुरते आहेत. शिवाजी महाराजांनी त्या काळी बांधलेले अभेद्य किल्ले बांधले आजही बांधकाम व्यवस्थापन कसे असावे याची ग्वाही देते. महाराजांचे अर्थव्यवस्थापन करण्याची कला आणि त्यांची कार्यपद्धती आज सर्वानी आत्मसात करायला हवी.
शिवराय म्हणजेच सळसळत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा झरा.शिवबा, जाणता राजा, रयतेचा राजा हे शब्द आजही कानी पडताच उर अभिमानाने भरून येतो आणि अंगात स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही. अशा एका झंझावाती वादळाचे व रयतेच्या कल्याणकारी राजाचे आचार, विचार मांडण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रणजित मधुकर पाटील यांनी केले तर प्रा. शेखर खैरनार यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button