मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचे जिल्हा रुग्णालयात उदघाटन
मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

पिंपरी (प्रतिनिधी) सांगवी येथील जिल्हा अंधत्व निवारण सोसायटीच्या वतीने दि. २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. लवेकर, जिल्हा नेत्रशल्य चिकीत्सक डॉ अंजली कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ वंदना जोशी, नेत्रशल्य चिकित्सक डॉ विक्रम काकडे, डॉ प्रज्ञा निकम, डॉ प्रिया हरिदास, समुपदेशक सीमा हगवणे, संतोष चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.या शिबिराच्या पहिल्याच दिवशी ८८५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
राज्यातून पुणे जिल्ह्यासाठी ८५०० सर्वाधिक जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट दिले आहे.
ही विशेष मोहीम जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्, बी जे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत रुग्णालय येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. त्यास रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा रुग्णालय व सलंग्न रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व पिंपरी चिंचवड मनपा, पुणे मनपा अंतर्गत रुग्णालय, खासगी रुग्णालय आणि अशासकीय संस्था यांचे विशेष मोहिमेत सहभागी झालेत. सर्व रुग्णालयातील नेत्रशल्य चिकीत्सक, निवासी डॉक्टर,भूलतज्ञ, नर्सिंग स्टाफ, नेत्रचिकित्सक, अधिकारी, इतर सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
नेत्रशल्य चिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी म्हणाल्या कि, नियमित नेत्र तपासणीचे फायदे आहेत. दृष्टिदोषाचे निदान लवकर होते. उपचारामुळे अधिक दृष्टी निरोगी ठेवता येते. रोज सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ पाण्याने डोळे धुणे, दुसऱ्याने वापरलेले टॉवेल, रुमाल वापरू नये, डोळ्यात कचरा गेल्यानंतर ते चोळू नये, याबाबतची माहिती जनजागृती कार्यक्रमातून करण्यात आली.
५० वर्षावरील व्यक्तींना खालील लक्षणे दिसल्यास तात्काळ डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
मोतिबिंदूची लक्षणे खालीलप्रमाणे
* दृष्टिदोष अस्पष्ट किंवा धुरकट दिसणे.
* रात्री दिसण्यास अडचण
* उजेडाच्या आजूबाजूला तेजकिरण / झगमग दिसणे
* रंग फिकट किंवा पिवळसर दिसणे
* एकाच डोळ्यात दोन प्रतिमा दिसणे
* वाचन किंवा टिव्ही पातहांना त्रास होणे
* वारंवार चष्मा बदलण्याची गरज वाटणे
* सर्व रुग्णांना शासकिय रूग्णालयामध्ये मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येतील.
* सर्व नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले.



