विज्ञान - तंत्रज्ञानपुणे

डॉ शिकारपूर यांनी जागवल्या डॉ नारळीकरांच्या आठवणी..

डॉ जयंत नारळीकर निधनानिमित्त शोकसंदेश डॉ दीपक शिकारपूर

दीपक तू कॉलेजमध्ये जावून…
पुणे (प्रतिनिधी) महान गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व, डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन हे देश आणि विज्ञान विश्वासाठी एक अपूर्व शोकस्मरण ठरले आहे. त्यांनी खगोलशास्त्राच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले आणि आपल्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा दिली. एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ असण्याबरोबरच ते एक लोकप्रिय लेखक होते.

त्यांची लेखनशैली सुसंवादी आणि उपयुक्त होती , ज्यामुळे शास्त्राची गती व वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवला जात असे. माझ्या संगणक क्षेत्रातील लेखनाचे प्रेरणास्तोत्र नारळीकर सर होते . अनेक सामाजिक , शास्त्रीय परिषदात त्यांची भेट होत असे . माझी काही पुस्तके सरांना भेट दिली होती. माझ्या लेखनाचे त्यांना अप्रूप व कौतुक होते . एक संगणक व्यावसायिक पदरमोड करून समाजप्रबोधनासाठी लेखन करतो आहे हे त्यांना भावले होते . त्यांनी एकदा मला सूचना केली “दीपक तू शाळा कॉलेजमधे जाऊन व्याख्याने दे ” . माझ्या दृष्टीने ती आज्ञा होती .

एक वैयक्तिक आठवण फारच प्रेरक आहे . सुमारे तीसेक वर्षांपूर्वी पुण्यात एक आंतरराष्ट्रीय संगणक परिषद होणार होती. अनेक प्रथितयश वक्ते व प्रतिनिधी सामील होणार होते . मी आयोजन समितीत कार्यरत होतो . आम्ही परिषदेसाठी योग्य ठिकाण शोधत होतो. काहींनी आयुका सभागृह सुचवले होते . पण आयुका त्यावेळी बाहेरील संस्थांना वापरायला परवानगी देत नसे . मी कै वसंतराव गोवारीकरांबरोबर सरांना भेटायला गेलो . त्यांनी परिषदेचे स्वरूप समजून घेतले व आनंदाने परवानगी दिली . फक्त एक अट घातली काही रांगा आयुका च्या शास्त्रज्ञांसाठी राखीव ठेवा . आम्ही ती अट मान्य केली . उदघाटन सोहळ्यात त्यांच्यासाठी व्यासपीठावर स्थान आरक्षित होते . पण ते आले नाहीत . काही वेळानंतर मी पहिले की नारळीकर सर हळूच येऊन आयुकाच्या आरक्षित रांगेत जाऊन बसले होते . मी त्यांना विनंती केली कि सर आपण व्यासपीठावर या . ते आले नाहीत . नंतर भोजनाच्या वेळी मी त्यांना पृच्छा केली “सर तुम्ही व्यासपीठावर का आला नाहोत ?” . त्यांचे उत्तर थक्क करणारे होते . ते म्हणाले “दीपक तुमची परिषद संगणक क्षेत्रातील आधुनिक प्रवाहांबद्दल आहे , त्या बद्दल माझे ज्ञान तोकडे आहे , मी प्रेक्षक म्हणूनच बरा ” . इतका थोर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ पण किती साधे होते . त्यांना बडेजाव अजिबात नव्हता . ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो

(डॉ दीपक शिकारपूर हे लेखक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button