आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत ड्रीम्जच्या स्केटर्सची इंडोनेशियात नेत्रदिपक कामगिरी
७ विद्यार्थ्यांना पदके प्राप्त

पिंपरी (प्रतिनिधी ) पिंपळे सौदागर येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबच्या स्केटर्सनी इंडोनेशियातील सेमारंग येथील जातीदिरी आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक येथे आयोजित ‘चॅम्प ऑफ चॅम्प २०२५’ या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पोर्ट्स एलपीयू भारतीय संघाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एकूण ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्य पदके मिळवली आहेत. सेमारंग येथील स्पर्धेत अनेक देशांतून एकूण ८९६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये भारतातील १५ खेळाडूंचा समावेश होता. 
तसेच या खेळाडूंची ऑगस्ट महिन्यात फुकेत थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धा तसेच आईस स्केटिंग ट्रैनिंग कॅम्प व आईस स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गोवा स्केटिंग फेस्टिव्हल 1 ते 2 फेब्रुवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धेत विविध राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या दोन दिवसीय स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. आयोजक राहुल बिलगी म्हणाले की, या निवड चाचण्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, येत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली जाईल. या निवड चाचण्या स्पोर्ट्स एल यु पी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सर्व विजेत्यांना आंतरराष्ट्रीय प्रायोजकत्व म्हणून रु. ३०,०००/- देण्यात आले.
आंतर राष्ट्रीय इंडोनेशिया स्पर्धेचा पुढील प्रमाणे
या स्पर्धेत पदके जिंकलेल्या भारतीय खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.
१. दर्शन ललित लोढा (वय – ११ वर्ष, इ – ५वी, प्रॉडिजी पब्लिक स्कूल पुणे) – रौप्य पदक.
२. रिधेश रवींद्र कुडचे (वय – ८ वर्ष, इ – २री, – डी ए व्ही स्कूल) – १ सुवर्णपदक, २ कांस्यपदके.
३. श्रीअंश विश्वकर्मा (वय – ७ वर्ष, इ – २री, जी. के. गुरुकुल स्कूल पिंपळे सौदागर) – १ सुवर्णपदक, २ कांस्यपदके.
४. आद्विक अभिजीत मनिखेडकर (वय – ६ वर्ष, इ- १ली, युरो स्कूल वाकड) – २ कांस्यपदके.
५. संग्राम सुरेश शेळके (वय – १२ वर्ष, इ – ७वी, – अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय, पिंपळे सौदागर) – १ सुवर्णपदक, १ कांस्यपदक.
६. मुकुला अमित इंगळे (वय – ९ वर्ष, इ – ३री, – विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट चिंचवड) – १ रौप्यपदक, १ कांस्यपदक.
७. स्वप्नील संतोष सरवदे (वय – १५ वर्ष, इ – ९वी, – अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर) – १ रौप्यपदक.
नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबचे हे सातही खेळाडू आपल्या खेळ कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. या खेळाडूंना इंडोनेशियाच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षकांनी विशेष तयारी करून घेतली. विजेत्या खेळाडूंच्या यशामध्ये प्रशिक्षक वैभव बिळगी, राहुल बिळगी, वंदना बिळगी, सूरज दीक्षित, राजेश शर्मा, प्रिनल शर्मा, मायकल डेविड , प्रतीक पांचाळ , समृद्धी शेटे आणि चिंतामण राऊत यांचे मोलाचे योगदान आहे .
मुंबईतील शिव छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघाच्या आगमनावेळी सर्व विजेत्यांचे जल्लोषात स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या वेळी स्पोर्ट्स एल यु पी संघटनेचे पदाधिकारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबने या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले. या क्लबने खेळाडूंना सर्वोत्तम सुविधांची उपलब्धता करून दिली आणि त्यांच्या सरावासाठी अत्याधुनिक स्केटिंग ट्रॅक उपलब्ध करून दिला. तसेच, खेळाडूंच्या आहार आणि फिटनेसवरही विशेष लक्ष दिले गेले. नाना काटे यांनी यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!



